डोंबिवलीतील जवाहिऱ्याची ७० लाखांची फसवणूक
सोने उचलून पैसे न देता शिवीगाळ व दमदाटी; तिघांविरुद्ध मानपाडा पोलिसांत गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील एका जवाहिऱ्याकडून टप्प्याटप्प्याने सोने खरेदी करून तब्बल ६९ लाख ९० हजार ४८० रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पैसे मागण्यासाठी गेलेल्या जवाहिऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचीही घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
फसवणूक झालेल्या जवाहिऱ्याचे नाव किसनसिंह सुदाना (वय ४८) असून ते गांधीनगर परिसरात राहतात. त्यांचे डोंबिवली पूर्वेतील गोळवली-दावडी रस्ता येथील भाजी बाजार परिसरात ‘अंबिका ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. अनेक वर्षांपासून ते या भागात सोने-चांदीचा व्यवसाय करत आहेत.
या प्रकरणात शहाड येथील शबीना इम्रान खान, इम्रान खान आणि दावडी येथील वल्ली जैस्वाल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ ऑक्टोबर ते ४ डिसेंबर २०२५ या दोन महिन्यांच्या कालावधीत ही फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
🔴 विश्वास संपादन करून उचलले लाखोंचे सोने
तक्रारीनुसार, संबंधित तिघे ग्राहक म्हणून नियमितपणे दुकानात येत होते. सुरुवातीला लहान प्रमाणात खरेदी करून त्यांनी जवाहिऱ्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये १७० ग्रॅम, पुढे टप्प्याटप्प्याने ३०१ ग्रॅम, २६० ग्रॅम, १५७ ग्रॅम आणि ५५० ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी उचलले. “पैसे लगेच देतो” असे आश्वासन देत त्यांनी जवळपास ७० लाख रुपयांचे दागिने उचलून नेले, मात्र पैसे दिलेच नाहीत.
🔴 पैसे मागितल्यावर धमकी
दोन महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने किसनसिंह सुदाना यांनी वारंवार तगादा लावला. मात्र आरोपीनं विविध कारणे देत पैसे देणे टाळले. अखेर सुदाना हे इम्रान खान यांच्या घरी पैसे मागण्यासाठी गेले असता, “पैसे मागायला पुन्हा घरी येऊ नका” असे म्हणत त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
🔴 गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक, धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ पुढील तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून आरोपींचा शोध सुरू आहे.