डोंबिवली आडिवलीत घर खरेदीत १७.८० लाखांची फसवणूक; साई डेव्हलपर्सविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

डोंबिवली आडिवलीत घर खरेदीत १७.८० लाखांची फसवणूक; साई डेव्हलपर्सविरोधात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली : डोंबिवलीजवळील आडिवली ढोकळी गावात घर खरेदीच्या नावाखाली एका महिलेची तब्बल १७ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईतील तळोजा परिसरात राहणाऱ्या रश्मी रवींद्र ठुकरूल यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात साई डेव्हलपर्सचे विकासक भूषण सोनवणे, रोहन गायकवाड आणि जमीन मालक विजय भाने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२५ या कालावधीत आडिवली ढोकळी येथील सर्वे क्रमांक १७, हिस्सा क्रमांक ४ या जमिनीवरील ‘फ्लाय रेसिडेन्सी’ या इमारत क्रमांक ८ मधील खोली क्रमांक १०१ ही सदनिका खरेदी करण्यासाठी तक्रारदार दाम्पत्याने टप्प्याटप्प्याने १७ लाख ८० हजार रुपयांची रक्कम विकासकांकडे अदा केली होती. मात्र, पाच वर्षे उलटून गेली तरी अद्याप सदनिकेचा ताबा देण्यात आलेला नाही. तसेच वारंवार पाठपुरावा करूनही भरलेली रक्कम परत करण्यात आलेली नाही.

आडिवली ढोकळी परिसर हा बेकायदा बांधकामांसाठी ओळखला जात असून या भागातील अनेक इमारती यापूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाकडून जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. काही इमारती अनधिकृत घोषितही करण्यात आल्या असून त्यामुळे घर खरेदीदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, सदनिकेचा ताबा न देता तसेच पैसे परत न करता विकासकांनी अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोरे पुढील तपास करत आहेत.

गेल्या वर्षभरात डोंबिवली-कल्याण परिसरात घर खरेदीत फसवणुकीचे प्रकार वाढल्याने ठाणे व मुंबई परिसरातून येणाऱ्या ग्राहकांचा ओघही घटला आहे. याचा फटका अधिकृत आणि नियमबद्ध बांधकाम करणाऱ्या विकासकांनाही बसत असल्याची प्रतिक्रिया रिअल इस्टेट क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon