ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : मेफेड्रोन विक्री करणारे रॅकेट उध्वस्त, जवळपास १.०१ कोटींचा एम.डी. जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे यांनी मेफेड्रोन (एम.डी.)चा मोठा साठा विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत तब्बल ९९९.२ ग्रॅम एम.डी. आणि मोबाईल फोन मिळून १,००,९२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कापुरबावडी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हा क्रमांक ७५६/२०२५ (एनडीपीएस कायदा कलम ८(क), २१(ब), २१(क), २९) च्या तपासादरम्यान कारवाई करण्यात आली.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथकाने प्रथम सचिन सुभाष चव्हाण याला ताब्यात घेत त्याच्याकडून २९.०६ ग्रॅम एम.डी. जप्त केला. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवून आरोपी रवि शामवीर डागुर याला पकडण्यात आले. त्याच्याकडून अंगझडतीत ३४ ग्रॅम आणि घरझडतीत तब्बल ९२२ ग्रॅम मेफेड्रोन सापडले.
दोन्ही मुख्य आरोपींसह एकूण सहाजणांना अटक करून जवळपास एक किलो मादक पदार्थ जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सुनिल तारमळे करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ऑपरेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, तसेच पथकातील विविध अधिकाऱ्यांचा सहभाग होता.