मराठी भाषा अभिजात; अभिजनांची आणि बहुजनांची — पद्मश्री डॉ. गणेश देवी
रवि निषाद / मुंबई
मुंबई – “जगातील सुमारे सात हजार भाषांपैकी मराठी ही १८व्या क्रमांकाची बोली जाणारी भाषा आहे, तसेच १५०० वर्षे जुन्या भाषांमध्ये तिचा सातवा क्रमांक आहे. मराठी अभिजनांची भाषा झाली कारण ती मुळातच बहुजनांची आहे,” असे प्रतिपादन मराठी भाषा तज्ज्ञ आणि पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी केले.
लालबाग येथे विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित ६८व्या विवेकानंद व्याख्यानमालेतील ‘भाषा अभिजात आणि बहुजन’ या विषयावरील तिसऱ्या पुष्पाचे गुंफण करताना ते बोलत होते. पुढील ३० वर्षांत जगातील विद्यमान ७ हजार भाषा लुप्त होतील, असे धोक्याचे भाकीतही त्यांनी यावेळी केले.
डॉ. देवी म्हणाले, “मराठीला ज्ञानाची आणि कानी भिडणारी भाषा बनवणे गरजेचे आहे. संस्कृत आणि प्राकृत या भाषांची सातत्याने झालेली सरमिसळ प्राकृत नष्ट होण्यास कारणीभूत ठरली; मात्र संस्कृत आजही टिकून आहे. नवी तंत्रज्ञानमानसशास्त्र लोकांची स्मरणशक्ती अल्पकालीन करत आहे.”
यावेळी एम.के. बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे महेंद्र साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले, “आयुष्यात पुढे जाण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. माझ्या मते समाजात फक्त दोन जाती गरीब आणि श्रीमंत या महत्त्वाच्या आहेत. आर्थिक दृष्ट्या श्रीमंत व्हा, पण त्याहून महत्त्वाची आहे शारीरिक श्रीमंती.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमंडळ प्रमुख नरेश विचारे यांनी केले. मान्यवरांची ओळख आणि आभार प्रदर्शन शारदास्मृतीचे सहाय्यक प्रमुख साहिल पाटील यांनी केले. बोधपट वाचन आर्यन वारे यांनी तर सुस्वागतम प्रथम होडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता गीतकार गणेश पवार यांच्या गीत सादरीकरणाने झाली.