डेटिंग एपवर ओळख झालेल्या तरुणीला हॉटेलवर घेऊन गेलेल्या तरुणाची तब्बल १ लाख ८३ हजारांची लुट; दोन तरुणींना अटक

Spread the love

डेटिंग एपवर ओळख झालेल्या तरुणीला हॉटेलवर घेऊन गेलेल्या तरुणाची तब्बल १ लाख ८३ हजारांची लुट; दोन तरुणींना अटक

योगेश पांडे / वार्ताहर

मीरा-भाईंदर – ठाण्याच्या मीरा भाईंदर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाला डेटिंग एपवर ओळख झालेल्या तरुणीला घेऊन हॉटेलवर राहाणं चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित तरुणीने तब्बल १ लाख ८३ हजारांना लुटलं आहे. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन तरुणींना अटक केली आहे. संबंधित तरुणींनी अशाच प्रकारे अनेक तरुणांना फसवल्याचा संशय आहे. पोलीस त्याअनुषंगाने तपास करत आहेत.

अरुनिमा उर्फ रूथ लुकास नायडू (२८) आणि बिमलादेवी श्रवणकुमार सिंग (३०) असं अटक केलेल्या आरोपी तरुणींची नावं आहेत. या प्रकरणी रणजीत नावाच्या ३१वर्षीय तरुणाने फिर्याद दाखल केली होती. या तरुणींनी ‘हॅपन डेटिंग अॅप’चा वापर करून रणजितला हॉटेलमध्ये पार्टीच्या बहाण्याने बोलावलं होतं. यानंतर आरोपी तरुणींनी त्याचा १ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजितची ‘हॅपन डेटिंग एप’वर अरुनिमा नावाच्या तरुणीशी ओळख झाली होती. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर, या दोघींनी रणजितला हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी बोलावले. दारूच्या नशेत रणजित धुंद झाल्याची संधी साधून या दोघींनी त्याचे सुमारे १ लाख ८३ हजार रुपयांचे मौल्यवान सामान घेऊन पोबारा केला.

या दोघींच्या अटकेमुळे काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील असाच आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. कांदिवली येथे राहणाऱ्या शार्दुल नावाच्या तरुणाची याच ‘हॅपन डेटिंग एप’वर अरुनिमा (२७) नाव सांगणाऱ्या तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर दोघे काशिमीरा परिसरातील पंचरत्न लॉजमध्ये मुक्कामासाठी आले.

पोलिसांनुसार, खोली बुक केल्यानंतर शार्दुल दारूच्या नशेत झोपी गेला. सकाळी उठून पाहिले असता त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन, मोबाइल, पॉवर बँक आणि इअरफोन जागेवर नव्हते. तसेच ती तरुणीदेखील तिथून निघून गेली होती. या प्रकरणी शार्दुलने काशिमीरा पोलिसात बुधवारी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याबद्दल अनोळखी तरुणीवर गुन्हा दाखल केला होता. मांडवी पोलिसांनी अटक केलेल्या याच दोघींनी काशिमीरा येथेही शार्दुलला लुटल्याचे आता उघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon