घाटकोपरच्या असल्फा विभागात सासूची हत्या; सुनेला पोलिसांची केली अटक
रवि निषाद / मुंबई
मुंबई – घाटकोपर (प.) येथील असल्फा परिसरात राहणाऱ्या ६३ वर्षीय ज्येष्ठ महिलेला तिच्याच सावत्र सुनेने लुटीच्या आणि प्रॉपर्टीच्या वादातून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव सहनाज अनिस काजी (६३) असे आहे. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुमताज इरफान खान ही सहनाज यांच्या पतीच्या पहिल्या पत्नीची सून आहे. सहनाज या वृद्ध असल्यामुळे घरात एकट्याच राहत होत्या. प्रॉपर्टीत हिस्सा मिळावा आणि त्यांच्या दागिन्यांवर अधिकार मिळावा यासाठी मुमताजने कट रचल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
बुधवारी रात्री मुमताज सहनाज यांच्या घरी आली. लुटीच्या उद्देशाने तिने सहनाज यांना प्रथम मारहाण केली आणि त्यानंतर त्यांची हत्या केली. अंगावरील दागिने काढून आरोपी घटनास्थळावरून फरार झाली.
घटनेनंतर परिमंडळ ७ चे पोलिस उपायुक्त राकेश ओला, सहायक पोलिस आयुक्त शैलेश पासळवार आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक पुरावे आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत कुर्ला परिसरातून केवळ २४ तासांच्या आत मुमताजला अटक करण्यात यश मिळवले.
घाटकोपर पोलिस ठाण्यात या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.