२५ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी पार्कात वंचित बहुजन आघाडीची ‘संविधान सन्मान महासभा’
रवि निषाद / मुंबई
मुंबई – वंचित बहुजन आघाडी तर्फे २५ नोव्हेंबर रोजी दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ‘संविधान सन्मान महासभे’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महासभेला वंचित बहुजन आघाडीचे सरसेनापती अॅड. प्रकाश आंबेडकर हे मार्गदर्शन करणार असून, राज्यभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महासभेच्या तयारीला राज्यभरात वेग आला असून, मुंबईच्या चेंबूरमधील प्रभाग १५० मध्येही मोठी हालचाल सुरू आहे. या प्रभागात आंबेडकरी समाजाची लक्षणीय संख्या असल्याने येथे विशेष तयारी करण्यात येत आहे. आगामी बीएमसी निवडणुकीत प्रभाग १५० मधून उमेदवारीची तयारी करणाऱ्या श्रीमती तन्वी किरण साळवे यांनी या सभेसाठी जोरदार मोहीम उभी केली आहे.
पी.एल. लोखंडे मार्ग परिसरातील नागवाडी, कादरिया नगर, माळेकर वाडी, गुलशन बाग, बाबासाहेब आंबेडकर नगर, नुरानी बाग, पंजाबी चाल, फुले नगर यांसह संपूर्ण प्रभागात पोस्टर्स, बॅनर्स आणि कटआउट्सच्या माध्यमातून महासभेचे जोरदार प्रमोशन करण्यात आले आहे. यामुळे परिसरात तन्वी किरण साळवे यांच्या पुढाकाराची विशेष चर्चा रंगली आहे.
स्थानीय कार्यकर्त्यांच्या मते, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची लेक” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तन्वी साळवे यांना प्रभागातील मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आगामी निवडणुकीत ‘लढायचे आणि जिंकायचे’ असा त्यांचा निर्धार आहे. २५ नोव्हेंबर रोजी होणारी अॅड. प्रकाश आंबेडकर यांची ‘संविधान सन्मान महासभा’ अभूतपूर्व यशस्वी करणे, हेच या प्रभागातील आंबेडकरी जनतेचे ध्येय असल्याचेही सांगितले जात आहे.