उल्हासनगरात सराईत गुंड बाबू गायकवाडला अटक; हिललाईन पोलिसांची धाडसी कारवाई, घरात घुसून घेतले ताब्यात

Spread the love

उल्हासनगरात सराईत गुंड बाबू गायकवाडला अटक; हिललाईन पोलिसांची धाडसी कारवाई, घरात घुसून घेतले ताब्यात

महेंद्र उर्फ अण्णा पंडित / वार्ताहर

उल्हासनगर : परिसरात दहशत निर्माण करणारा आणि अनेक गुन्ह्यांमध्ये वॉण्टेड असलेला सराईत गुंड बाबू गायकवाड याला हिललाईन पोलिसांनी शनिवारी सकाळी एक नियोजित आणि धाडसी कारवाई करून अटक केली. गायकवाड आपल्या घरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथकाने तत्काळ सापळा रचत घरात घुसून त्याला ताब्यात घेतले.

हिललाईन पोलिस ठाण्याला बाबू गायकवाड आपल्या कुटुंबासह उल्हासनगर मधील राहत्या घरी असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने परिसरात गुप्तरीत्या चौकशी करून घरावर लक्ष ठेवले.

शनिवारी पहाटे ५ वाजता पोलिसांनी अचानक धाड टाकली. घराचे दरवाजे उघडताच गायकवाडाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने वेगवान कारवाई करून त्याला पकडले. गायकवाडने पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी खोटी नावे वापरणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहणे अशी युक्ती अवलंबत होता.

अटक करण्यात आलेला बाबू गायकवाड हा खंडणी, मारहाण, तोडफोड, जीवितास धोका निर्माण करणे अशा गंभीर स्वरूपाच्या अनेक गुन्ह्यांमध्ये वॉण्टेड होता. त्याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यांमध्ये दहा पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत. परिसरात त्याची गुंडगिरी, धमक्या आणि वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नामुळे नागरिक त्रस्त झाले होते.

अटक करण्यात आलेल्या गायकवाडची चौकशी सुरू असून त्याच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याचे साथीदार, खंडणी रॅकेट आणि बेकायदेशीर व्यवहार या संदर्भात पोलिसांनी तपासाची दिशा वाढवली आहे.

हिललाईन पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांमध्ये कौतुक होत आहे. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडावर कारवाई झाल्यामुळे रहिवाशांनी दिलासा व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon