मनोज जरांगेंच्या समर्थकाचा मृत्यू; गाडीवर संशयास्पद मजकूर, पोलिसांची वर्दी आढळल्याने बीडमध्ये खळबळ

Spread the love

मनोज जरांगेंच्या समर्थकाचा मृत्यू; गाडीवर संशयास्पद मजकूर, पोलिसांची वर्दी आढळल्याने बीडमध्ये खळबळ

योगेश पांडे / वार्ताहर

बीड – पाटोदा तालुक्यातील दासखेड फाटा परिसरात शनिवारी उशिरा झालेल्या अपघातात मराठा आरक्षण आंदोलनाचे सक्रिय समर्थक अतुल घरत यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघाताचं गांभीर्य, गाडीवरील संशयास्पद मजकूर आणि चालक फरार झाला आहे. त्यामुळे मोठा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतुल घरत हे दुचाकीवरून घरी जात असताना स्विफ्ट कारने त्यांच्या वाहनाला जबरदस्त धडक दिली. धडक इतकी भीषण होती की घरत गंभीर जखमी झाले. स्थानिकांना घटना लक्षात येताच त्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर घटनास्थळी असलेल्या कारवर ‘अण्णा’ असा मजकूर लिहिलेला आहे. तसेच गाडीत पोलिसाची वर्दी आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा नेहमीचा अपघात नसून ‘घातपात असू शकतो’ असा संशय सोशल मीडिया आणि स्थानिकांमध्ये व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्यामुळे स्थानिकांनी आणि आंदोलनकर्त्यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत फरार आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकाचा अशा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यामुळे वातावरण तापले असून जिल्ह्यात चर्चा, संताप आणि असंतोषाचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. गाडीची नंबर प्लेट, मजकूर आणि वर्दीच्या मुद्द्यांवर तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon