ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबल्याने कारचा ताबा सुटला; ९ जण जखमी, वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबल्याने कारचा ताबा सुटला; ९ जण जखमी, वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

वसई : होळीच्या पूर्वसंध्येला वसई येथील सातीवली परिसरात नवख्या चालकाकडून ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबले गेल्याने कारचा ताबा सुटून रस्त्याने जाणाऱ्या नऊ नागरिकांना धडक बसल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेवरलेट कंपनीची ‘बीट’ ही कार मोबिन मोनिर अहमद (४९) हा नवखा चालक मित्राकडून घेत चालवत होता. मौर्या नगर येथील गर्दीच्या ठिकाणी वाहन चालवताना त्याच्याकडून ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबले गेले. त्यामुळे कार थेट रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांवर आदळली.

या अपघातात जखमी झालेल्या नऊ जणांपैकी काहींना प्लॅटिनम हॉस्पिटल येथे, तर तिघांना डी. एम. पेटिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एका जखमीवर विवान हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले. सर्व जखमींना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. काही जखमींना तीन ते पाच टाके घालावे लागल्याची माहिती आहे.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, वेगात आलेली कार अनेकांना उडवत पुढे थांबली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात हलवले. काही काळासाठी मोठी गर्दी जमली होती.

दरम्यान, वालीव पोलीस ठाणे पोलिसांनी चालक मोबिन मोनिर अहमद याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत केली. अचानक घडलेल्या या अपघातामुळे होळीच्या सणाच्या उत्साहावर पाणी फेरले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon