कोयत्याच्या धाकाने तरुणावर हल्ला; दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या तिघांना अटक, ३.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
बारामती : शहरातील तांदुळवाडी परिसरात तरुणावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बारामती येथील तांदुळवाडी विमानतळ रोडलगत एलसी कंपनी लेक परिसरातील मोकळ्या जागेत फिर्यादी संतोष रायनवार (नाव बदलले आहे) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते. त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेले तिघे इसम त्यांच्या जवळ आले. त्यांनी लोखंडी सत्तूर व कोयत्याचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. विरोध केल्यावर एका आरोपीने फिर्यादीच्या डाव्या पायावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले.
यानंतर आरोपींनी फिर्यादीकडील सुमारे २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (अंदाजे ३ लाख रुपये), चांदीची अंगठी (५ हजार), चांदीची चैन (१५ हजार), आणखी एक चांदीची अंगठी (२ हजार) तसेच २ हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. ‘पुन्हा इकडे दिसायचे नाही,’ अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाणे येथे बी.एन.एस. कलम ३०९(६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी प्रसाद गणपत भोसले (२४), धैर्यशील प्रशांत आगवणे (१९) आणि कृष्णा नाना गाडेकर (२१) यांना अटक केली. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील तसेच पोलीस पथकाने केली.