मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणात मालवणीमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने; भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर प्रचंड आक्रमक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मालाडच्या मालवणी येथे अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर रविवारी मोठा गोंधळ उडालेला बघायला मिळाला. भाजप युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मालवणीत एकत्र जमत काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या भागातच काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचं कार्यालय असल्याची माहिती आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजप आंदोलकांकडून करण्यात आला. आंदोलकांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांची प्रचंड मोठी गर्दी जमा झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनसथित नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. मालाड मालवणी पोलीस ठाण्यात अस्लम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी आंदोलकांनी गेली.
विशेष म्हणजे भाजपच्या आंदोलकांनी मलाड मालवणी पोलीस ठाण्याच्या बाहेर देखील जोरदार आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांकडून पोलीस ठाण्याच्या बाहेर दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं.तसेच आंदोलकांकडून परिसरातील अस्लम शेख यांचे बॅनर्स फाडण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला. आंदोलकांचा एक गट जास्त आक्रमक झालेला बघायला मिळाला.
खरंतर अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या काही आंदोलकांना ताब्यात घेत मालवणी पोलीस ठाण्यात आणलं होतं. यानंतप भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासह आणखी काही नेते पोलीस ठाण्यात आले होते. याच दरम्यान मालवणी पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यानंतर अचानक इथले कार्यकर्ते आक्रमक झाले. आंदोलकांनी परिसरातील अस्लम शेख यांचे बॅनर फाडले. तसेच परिसरातील व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगितले. संभाव्य धोका लक्षात घेता व्यापाऱ्यांनी देखील तातडीने दुकानं बंद केली. पोलिसांकडून परिस्थिती हाताळण्यात आली.
मुंबई भाजप आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचताना दिसत आहे. भाजप नेते अमित साटम यांनी अस्लम शेख यांच्यावर सडकून टीका केली होती. अस्लम शेख यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्याचा आरोप करत भाजपकडून अस्लम शेख यांच्यावर टीका केली जात होती. यातूनच अमित साटम यांनी खोचक शब्दांत अस्लम शेख यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंधेरी येथे अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं.
यावेळी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आलेले बघायला मिळाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी अमित साटम यांच्या कार्यालयाच्या दिशेला जात अस्लम शेख यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन निवाळलं होतं. या घडामोडींनंतर रविवारी दुपारी पुन्हा मोठ्या घटना घडल्या.
भाजप युवा मोर्चाने अस्लम शेख यांच्या विरोधात मालाडच्या मालवणी येथे जोरदार आंदोलन केलं. यावेळी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळाले होते. अग्निशामक दलाच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर मालवणी पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळाले. काही आंदोलकांनी अस्लम शेख यांचे बॅनर देखील फाडले. पोलीस सध्या सर्व परिस्थिती हाताळताना दिसत आहेत.