पंकजा मुंडेंचा पीए अंनत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे डॉक्टर पत्नीची आत्महत्या; अनंत गर्जेंविरोधात पोलिसांची मोठी कारवाई
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीने मुंबईतील वरळीत राहत्या घरात आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. या घटनेने मुंबईत एकच खळबळ माजली आहे. अनंत गर्जे यांच्या अनैतिक संबंधांमुळे तणावात असल्याने डॉक्टर गौरी गर्जे यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचं फेब्रुवारी महिन्यात बीडमध्ये लग्न झालं होतं. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यात अनंत यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे सततची भांडणं होत असल्याचंही समोर आलं आहे.
डॉक्टर गौरी पालवे या केईएम रुग्णालयात काम करायच्या. शनिवारी त्या दुपारी १ वाजेपर्यंत रुग्णालयातच होत्या, त्यानंतर त्या घरी गेल्या आणि संध्याकाळी त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप गौरी यांच्या कुटुंबीयांनी केला. गौरी यांचे कुटुंबीय आक्रमक झाले होते. त्यानंतर रविवारी वरळी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे- आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर कलम १०८, ८५, ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर त्रास देणे, अपमान करणे आणि जीव घेण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. गौरी यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, गौरीने आपला जीव दिला नसून तिची हत्या करण्यात आल्याची दावाही गौरी यांच्या वडिलांनी केला. आता या प्रकरणात पोलिस पुढील काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे.
डॉक्टर गौरी गर्जे यांना पती अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांबाबत कळाल्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले होते. सासरच्यांकडून गौरी गर्जे यांचा छळही केला जात असल्याचा दावा गौरी यांच्या मामांनी केला आहे. तसेच, गौरीने पतीच्या मोबाईलमध्ये काही चॅटिंगही पकडल्याचं त्यांनी सांगितलं. या सगळ्यामुळे तणावात येऊन त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.