मुंबईतील ४ वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणाचा उलगडा
वाराणसीतील अनाथाश्रमातून मुलगी सुखरूप सापडली; सहा महिन्यांच्या शोधानंतर पोलिसांना यश
सुधाकर नाडार/ मुंबई
मुंबई – माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यातील ४ वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणाचा अखेर सहा महिन्यांनंतर यशस्वी उलगडा झाला असून ही मुलगी वाराणसीतील एका अनाथाश्रमातून सुरक्षित अवस्थेत सापडली आहे. २० मे २०२५ रोजी सीएसटी परिसरातून या मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केले होते. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सीसीटीव्ही तपासात अपहरण करणारा इसम मुलीला घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनसवरून बनारसकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली. ट्रेन ज्या-ज्या स्थानकांवर थांबली त्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
वाराणसीत ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट, स्थानिक पोलीस व विविध संस्थांच्या मदतीने जवळपास १२ दिवस शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता.
नव्या पथकाची नियुक्ती आणि तपासाला गती:
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख आणि उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशानुसार ९ नोव्हेंबरला माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक व आझाद मैदान पोलिसांचे अधिकारी यांची विशेष टीम पुन्हा वाराणसीत पाठवण्यात आली.
स्थानिक पत्रकारांना माहिती दिल्यानंतर एका पत्रकाराने पथकास कळविले की काशी अनाथाश्रमात ४ वर्षांची मराठी बोलणारी मुलगी जून २०२५ पासून आहे. ही माहिती तपासात निर्णायक ठरली.
१२ नोव्हेंबरला मुलगी सुरक्षित ताब्यात
पथकाने तत्काळ अनाथाश्रमात जाऊन मुलीची ओळख पटवली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून १२ नोव्हेंबर २०२५ रोजी मुलीला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. सहा महिन्यांपासून हरवलेली मुलगी सुखरूप सापडल्याने पोलीस दलाच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कामगिरीत पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे व सुरक्षा) सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग डॉ. अभिनव देशमुख, परिमंडळ ०१ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त आझाद मैदान विभाग जगदीश कुलकर्णी व सदर तपासात सपोनि. सोमनाथ शिंदे, सपोनि. प्रविण शिंदे, सपोनि. धनेश सातकर, पोउपनि. सुरज देवरे, पोउपनि. रामप्रसाद चंदवाडे, सेवानिवृत्त सफाईदार पांडे, पो.ह. चव्हाण, म.पो.ह. कुटे, पो.ह. शिवगण, पो.ह. घाग, पो.ह. पवार, पो.ह. मोरे, पो.शि.क्र. हाके, पो.शि. वाघमोडे, पो.शि. पवार, पो.शि.क्र. मंडले, तसेच पोलीस मित्र घनश्याम गुप्ता.गुन्ह्याचे तपासी अधिकारी: पोलीस निरीक्षक फरीद एच. खान
मे महिन्यातील अपहरणानंतर दीर्घकाळ छडा लावून अखेर नोव्हेंबरमध्ये मुलगी सापडल्याने ही कामगिरी बृहनमुंबई पोलिस दलाच्या कार्यकुशलतेचे आणखी एक उदाहरण ठरली आहे.