आरटीओ अधिकारी विजय चव्हाणांसह पाच जणांवर खोटा गुन्हा रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Spread the love

आरटीओ अधिकारी विजय चव्हाणांसह पाच जणांवर खोटा गुन्हा रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

नागपूर : परिवहन विभागातील पदोन्नती व पदस्थापनेतील स्पर्धेमुळे आरटीओ अधिकारी रवींद्र भुयार यांना अडचणीत आणण्यासाठी खोटा गुन्हा रचल्याप्रकरणी नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यासह पाच जणांवर सिताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सेवानिवृत्त अधिकारी लक्ष्मण खाडे, आरटीओ अधिकारी दीपक पाटील, हेमांगीनी पाटील आणि आणखी एका अधिकाऱ्याचा समावेश असून पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

रवींद्र भुयार हे तेव्हा नागपूर शहर आरटीओ कार्यालयात कार्यरत होते. त्यांना पदस्थापनेपासून दूर ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कट रचल्याचा आरोप आहे. भुयार यांच्या विरोधात एका महिला अधिकाऱ्याला चुकीची माहिती देऊन ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. मात्र हा खटला ‘खोटा’ असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्यानंतर न्यायालयाने ‘ब वर्ग समरी’ अंतिम केली.

दरम्यान, परिवहन विभागातील बदली प्रक्रियेतील गैरव्यवहाराच्या तपासासाठी नागपूर शहर पोलिस आयुक्तांनी स्थापन केलेल्या विशेष एसआयटीने शासनास दिलेल्या अहवालातही या अधिकाऱ्यांच्या सहभागाचे पुरावे सादर झाले होते. जानेवारी २०२३ मध्ये महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवर चौकशी करण्यासाठी हेमांगीनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. मात्र चव्हाण यांच्या बॅचमेट असलेल्या पाटील यांनी समितीतील दीपक पाटील यांच्या मदतीने खोटा अहवाल तयार केल्याचा आरोप समितीतील अशासकीय सदस्या अनिता दार्वेकर यांनी केला. त्यांच्या खुलाशामुळे समितीचा गैरकारभार उघड झाला.

न्यायालयात दाखल विविध प्रकरणातील आदेश व भुयार यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अखेर विजय चव्हाण, दीपक पाटील, लक्ष्मण खाडे, हेमांगीनी पाटील व एका अधिकारी अशा एकूण पाच जणांवर दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

“पोलीसांकडून अद्याप कोणतीही माहिती नाही” — विजय चव्हाण
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विजय चव्हाण म्हणाले की, “पोलीसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती आम्हाला अद्याप मिळालेली नाही. संबंधित व्यक्तीने यापूर्वीही विविध तक्रारी व अवमानना याचिका दाखल केल्या आहेत. आम्ही कोणताही गैरप्रकार केलेला नाही. वेळ आल्यास आमची बाजू मांडू.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon