बेळगावातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक; बोगस कॉल सेंटरवर सायबर पोलिसांचा छापा, ३३ जणांना अटक
पोलीस महानगर नेटवर्क

बेळगाव – अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करत बेळगावातून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणूक केली जात असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. आझमनगरमधील मुख्य रस्त्यालगत असलेल्या कुमार हॉल येथे उभ्या करण्यात आलेल्या बोगस कॉल सेंटरवर गुरुवारी छापा टाकून पोलीसांनी ३३ जणांना अटक केली. यामध्ये पाच तरुणींचाही समावेश आहे. छाप्यात ३७ लॅपटॉप, ३७ मोबाईल फोन, ३ वायफाय राऊटर असा एकूण ८ लाखांहून अधिक किमतीचा साहित्य जप्त करण्यात आला.
ही माहिती पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, निरंजन राजे अरस, एसीपी जे. रघु यांची उपस्थिती होती. या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यासाठी सीआयडीची मदत मागितली असून इंटरपोलशी संपर्क साधला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
🔴 अमेरिकन नागरिकांची फसवणूक कशी?
कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांच्या मोबाईलवर ‘अॅमेझॉन ऑर्डर प्लेस झाली आहे’ असा मेसेज पाठविला जात असे. ऑर्डर रद्द करायची असल्यास कस्टमर केअर नंबरवर संपर्क साधण्याचे सांगितले जाई. फोन केल्यानंतर ग्राहकांकडून नाव, बँक खात्याची माहिती मिळवून ती पुढे बँक किंवा फेडरल ट्रेड कमिशनकडे ट्रान्स्फर होत असल्याचे भासवले जाई.
यानंतर “तुमच्या नावावर अनेक बँक खाती आहेत” असे खोटे सांगून त्यांच्या खात्यातील रक्कम हडप केली जात असे.
प्रत्येक कर्मचाऱ्यावर दररोज १०० हून अधिक कॉल करण्याची जबाबदारी होती. मार्च २०२५ पासून हे अवैध कॉल सेंटर सुरू असल्याचा अंदाज आहे.
🔴 मुख्य सुत्रधार फरारी
कुमार हॉल भाड्याने घेऊन हे कॉल सेंटर चालवणारे दोन प्रमुख आरोपी फरारी झाले असून ते परप्रांतीय असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष पथक स्थापन केले आहे.
🔴 सर्वजण परप्रांतीय; ११ राज्यांतील तरुणांचा सहभाग
या कॉल सेंटरमध्ये कामासाठी दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मेघालय, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, झारखंड, आसाम, नागालँड येथील तरुणांना पगारासह राहण्याची-जेवणाची सोय करून बोलावण्यात आले होते. कर्मचाऱ्यांना १८ ते ४५ हजार रुपयांपर्यंत वेतन देण्यात येत होते.
🔴 कारवाईत सहभागी पथक गौरविले
छाप्यात सायबर क्राईम शाखा, एपीएमसी व माळमारुती पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई केली. कारवाई करणाऱ्या पथकाला पोलीस आयुक्तांनी विशेष बक्षीस जाहीर केले आहे.
🔴 एफआयआर नोंद
सीईएनचे एएसआय एल. एस. चिनगुंडी यांच्या फिर्यादीनुसार कॉल सेंटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींची वैद्यकीय तपासणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे.
ही कारवाई होताच शहरात खळबळ उडाली असून अमेरिकन नागरिकांची किती प्रमाणात फसवणूक झाली आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.