सांगलीत दलित महासंघाच्या उत्तम मोहितेंना वाढदिनीच संपवणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या
योगेश पांडे / वार्ताहर
सांगली – सांगलीमधील गारपीर चौकातील उत्तम मोहिते यांच्या खुनातील मुख्य आरोपीसह इतर ३ आरोपी २४ तासामध्ये जेरबंद करण्यात सांगली पोलिसांना यश आले. सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. डीबी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून पाठलाग करुन या आरोपींना पकडले. मुख्य आरोपी गणेश सुरेश मोरे (२९), सतीश विलास लोखंडे (२७) अजय परशुराम घाडगे (२९) आणि योगेश ऊर्फ अभिजीत राजाराम शिंदे (३४) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
या गुन्ह्यातील पथकातील अधिकारी अंमलदार यांनी आरोपींचा शोध घेत असताना संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप पाटील यांना त्यांचेकडील गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि इतर ३ आरोपी हे जयसिंगपूर कोल्हापूर रोडवर जाणाऱ्या रोडवर एका ठिकाणी थांबले असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करुन या आरोपींना पकडले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर करत आहेत.
उत्तम मोहिते यांच्याशी झालेल्या वादानंतर आरोपीनी उत्तम मोहिते यांच्या राहते घरी जात चाकू, लोखंडी रॉड, धारधार हत्यारे व काठीने पोटात, छातीवर, कानावर, डोक्यात हातावर वार करुन खून केला होता. सदरची भांडणे सोडवण्यासाठी मयत उत्तम मोहितेंचा पुतण्या युसेफ सतीश मोहिते गेला असता गणेश मोरेनं त्याच्यावरही वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
सदर घटनेची माहीती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, अतिरिक्त कार्यभार, शहर विभाग सांगली तसेच अरुण सुगावकर, पोलिस निरीक्षक, सांगली शहर पोलिस ठाणे, सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, संजय मोरे, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा यांनी घटनास्थळी भेट देत सदर गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी सूचना दिल्या होत्या.