आरपीएफची खोटी वर्दी परिधान करून फिरणाऱ्या तरुणाला आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी केली अटक

Spread the love

आरपीएफची खोटी वर्दी परिधान करून फिरणाऱ्या तरुणाला आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी केली अटक

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – कल्याण रेल्वे स्टेशनवर रेल्वे संरक्षण दलाची खोटी वर्दी परिधान करून फिरणाऱ्या एका तरुणाला आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश जाधव असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव असून, तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील रहिवासी आहे. लहानपणापासून त्याला पोलीस वर्दीची प्रचंड क्रेझ होती. पोलीस दलात नोकरी करण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली नाही, म्हणून त्याने हा खोटा बनाव रचला होता. विशेष म्हणजे, त्याने आपल्या वयस्कर आई-वडिलांना आपण पोलीस झालो असल्याचे खोटे सांगितले होते.

बुधवारी कल्याण रेल्वे स्टेशन नेहमीप्रमाणे प्रवाशांनी गजबजलेले होते. आरपीएफ आणि जीआरपी पोलीस स्टेशन परिसरात नियमित गस्त घालत होते. याच दरम्यान, आरपीएफच्या जवानांना स्टेशनवर खांद्यावर एका स्टारची फित लावलेला एक अधिकारी फिरताना दिसला. हा अधिकारी कल्याण स्टेशनवर यापूर्वी कधीही दिसला नसल्यामुळे जवानांना संशय आला.

एका आरपीएफ जवानाने त्या अधिकाऱ्याची चौकशी केली असता, त्याची बोबडी वळली आणि हा अधिकारी नसून, केवळ वर्दी घालून फिरणारा तोतया असल्याचे उघड झाले. तातडीने आरपीएफच्या जवानांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कल्याण जीआरपीच्या स्वाधीन केले.

कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी या दिलेल्या माहितीनुसार अटकेत असलेल्या अविनाश जाधव याने एफवायबीए पर्यंत शिक्षण घेतले आहे. तो चरितार्थ चालवण्यासाठी एका हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करत होता. त्याचे आई-वडील गावी शेती करतात. अविनाशला लहानपणापासूनच पोलीस वर्दीचे आकर्षण होते. या तीव्र इच्छेपोटीच त्याने आरपीएफची वर्दी परिधान करून तो स्टेशनवर फिरत असताना पकडला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon