पुण्यातील नामांकित व्यापाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाचे अपहरण; जेजुरी पोलिसांच्या धाडसी कारवाईत काही तासांतच सुखरूप सुटका
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवारी दुपारी घडलेल्या एका थरारक घटनेने खळबळ उडाली. कापूरहोळ परिसरातून एका नामांकित व्यापाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण करण्यात आले. मात्र, जेजुरी पोलिसांच्या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे अवघ्या काही तासांतच या तरुणाची सुखरूप सुटका करण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाला XUV कारमधून जबरदस्तीने घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच जेजुरी पोलीस आणि नीरा पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. जेऊर व नीरा परिसरात नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, जेऊरकडून पिसुर्टीकडे जाणारी संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली.
पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता, रस्ता अरुंद असल्याने ती कार ऊसाच्या शेतात जाऊन अडकली. या गोंधळाचा फायदा घेत अपहरणकर्ते घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, पोलिसांनी तत्काळ कारमध्ये असलेल्या तरुणाची सुरक्षित सुटका केली.
या कारवाईत ग्रामस्थांचे सहकार्यही मोलाचे ठरले. युवकाच्या सुरक्षित सुटकेमुळे त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास जेजुरी पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस अधिकारी दीपक वाकचौरे यांनी दिली.