अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्यावर दुःखाचा डोंगर; आईचं निधन
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बॉलीवूडचे गुणी अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आई हेमवंती देवी (वय ८९) यांचं बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड येथील राहत्या घरी निधन झालं. काही काळापासून त्या आजारी होत्या.
अभिनेत्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “आईचं निधन आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत शांतपणे झालं. कृपया त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा आणि कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा.”
शनिवारी बेलसंड येथे कुटुंबीय व जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. पंकज त्रिपाठी आपल्या आईशी अत्यंत जिव्हाळ्याचं नातं ठेवत होते. त्यांनी अनेकदा सांगितलं होतं की त्यांच्या आयुष्यातील संयम, संस्कार आणि साधेपणा आईकडूनच मिळाला.
यापूर्वी, पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस त्रिपाठी यांचं निधन २१ ऑगस्ट २०२३ रोजी झालं होतं. वडिलांच्या निधनानंतर आता आईच्या जाण्याने त्रिपाठी कुटुंब शोकाकुल आहे.