माचिस न दिल्याने दुकानदाराला कोयता दाखवला; दोघांना महात्मा फुले पोलिसांची बेडी
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – सिगारेट पेटवण्यासाठी माचिस न दिल्याचा राग आल्याने दोन तरुणांनी टपरीवाल्याला कोयता दाखवून दहशत माजवली. हा प्रकार कल्याण स्टेशन परिसरात घडला असून, महात्मा फुले पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी टपरी चालकाकडून माचिस मागितली, पण नकार मिळाल्यावर संतापून कोयता काढला आणि प्रवाशांना धमकावले. हा प्रकार एका नागरिकाने मोबाईलमध्ये चित्रीत केला आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हिडिओ समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांनी तपास पथक तयार करून कारवाई केली. अटक केलेल्यांची नावे निलेश शेलार आणि मेघनाथ भंडारी अशी असून, दोघेही कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील रहिवासी आहेत. पोलिस त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासत आहेत.