लग्नाचे आमिष, खोटा सोहळा आणि पोबारा; धुळ्यात तरुणाची ३.२५ लाखांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
धुळे : लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या तरुणांना हेरून खोटे आमिष दाखवत लुटणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रीय झाल्याचे चित्र खान्देशात दिसून येत आहे. धुळे तालुक्यातील फागणे येथील एका तरुणाला अशाच पद्धतीने जाळ्यात ओढून तब्बल ३ लाख २५ हजार रुपये व सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फागणे येथील रहिवासी जितेंद्र रमेश पाटील हे सेंट्रींग कामगार आहेत. लग्नाचे वय झाल्याने कुटुंबीय मुलीच्या शोधात असताना त्यांची ओळख शहादा येथील ज्योती चुनिलाल निकम हिच्याशी झाली. तिने लग्नाचे आमिष दाखवत जितेंद्र पाटील यांच्याकडून वेळोवेळी फोन-पेद्वारे ७८ हजार रुपये उकळले.
१९ फेब्रुवारी रोजी ज्योती निकम ही साथीदारांसह एका खाजगी वाहनातून फागणे येथे आली. लग्न ठरविण्याच्या नावाखाली २ लाख २० हजार रुपये तसेच प्रवास खर्चासाठी २० हजार, अशी एकूण २ लाख ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. नातेवाईकांकडून पैसे उसनवारीने घेऊन जितेंद्र पाटील यांनी ही रक्कम आरोपींच्या स्वाधीन केली.
यानंतर त्याच दिवशी तथाकथित लग्न लावून देण्यात आले. सर्वांनी जेवण करून निघून गेल्यानंतर २० फेब्रुवारीच्या पहाटे सुमारे तीनच्या सुमारास नवरी म्हणून आलेली सरिता पवार आणि तिची सोबती रिना वळवी यांनी बाथरूमला जाण्याचे निमित्त करून घराबाहेरून कडी लावली आणि पलायन केले. जाताना घरातील ८५ हजार रुपये रोख व सहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत त्यांनी लंपास केली.
सकाळी प्रकार लक्षात आल्यानंतर मध्यस्थाशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. फसवणूक झाल्याची खात्री होताच जितेंद्र पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी ज्योती निकम, चुनिलाल निकम, सागर गवळी, सरिता पवार, रिना वळवी, अर्चना पाटील यांच्यासह आणखी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही टोळी सराईत असून यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त होत आहे. व्यवहारांशी संबंधित व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि छायाचित्रे पुराव्यादाखल उपलब्ध असल्याचे फिर्यादीने सांगितले. धुळे तालुका पोलीस अधिक तपास करीत असून, नागरिकांनी लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या एजंटांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.