बदलापूरमध्ये स्त्री बीज विक्री रॅकेटचा पर्दाफाश; तीन महिलांना सात दिवसांची पोलीस कोठडी

Spread the love

बदलापूरमध्ये स्त्री बीज विक्री रॅकेटचा पर्दाफाश; तीन महिलांना सात दिवसांची पोलीस कोठडी

पोलीस महानगर नेटवर्क

बदलापूर : बदलापूरमध्ये स्त्री बीज विक्रीच्या गंभीर आणि धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपी महिलांना अटक केली आहे. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत सुमारे ४० पीडित महिलांची ओळख पटली असून प्रत्यक्षात शेकडो महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आर्थिक आमिष दाखवून महिलांकडून बेकायदेशीर पद्धतीने बीज प्रक्रिया करून घेण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

प्राथमिक चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, एका महिलेला वैद्यकीय नियमांनुसार केवळ एकदाच बीज प्रक्रिया करण्याची परवानगी असताना, तिच्या आधार कार्डसह इतर कागदपत्रांचा गैरवापर करून अनेक वेळा ही प्रक्रिया करण्यात आली. या कागदपत्रांच्या गैरवापरामुळे नियमांची पायमल्ली करत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपासादरम्यान या स्त्री बीज विक्रीचा व्यवहार आंतरराज्य स्तरावर सुरू असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. या रॅकेटमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांचा सहभाग आहे का, तसेच बनावट किंवा गैरवापरासाठी लागणारी कागदपत्रे नेमकी कोण तयार करत होते, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणामुळे महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या संपूर्ण रॅकेटची मुळे उखडून टाकण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon