‘भास्कर जाधव नको’ ठरवणारे तुम्ही कोण?; विधानसभाध्यक्षांवर संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

Spread the love

‘भास्कर जाधव नको’ ठरवणारे तुम्ही कोण?; विधानसभाध्यक्षांवर संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : भास्कर जाधव यांच्या नावावर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केले असताना ‘भास्कर जाधव नको’ हे ठरवणारे तुम्ही कोण, असा थेट सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला. विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद देऊ नये यासाठी कारस्थान सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

ज्या मातीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले, त्या राज्यात लोकशाहीची गळचेपी होत असेल तर त्याची इतिहासात नोंद होईल, असे सांगत राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. आज सत्तेत असलेले उद्या नसतील; मात्र परंपरा तोडून व्यक्तिगत स्वार्थ साधला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

*विधानसभाध्यक्षांच्या भूमिकेवर सवाल*

विधानसभाध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीचे ‘पॉलिटिकल कॅरेक्टर’ पाहता निष्पक्ष निर्णय होईल का, याबाबत जनतेत शंका आहे, असे राऊत म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदासाठी मुख्यमंत्र्यांना वर्षभरापूर्वी पत्र दिले असतानाही निर्णय टाळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘मुख्यमंत्री अधिकार सभाध्यक्षांकडे ढकलतात आणि सभाध्यक्ष निर्णय प्रलंबित ठेवतात,’ असा टोला त्यांनी लगावला.

*अविश्वास ठरावाची मागणी*

संविधानाच्या विरोधात पक्षांतराबाबत ‘तद्दन खोटे आणि भंपक’ निर्णय देणाऱ्या सभाध्यक्षांकडून काय अपेक्षा करणार, असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी विधानसभाध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी केली. विधानमंडळ मनमानी आणि झुंडशाही पद्धतीने चालवले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon