छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूती विभागाच्या खाटा वाढल्या; एम.एम. व्हॅली प्रसूतिगृह होणार अद्ययावत
महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे जलद कार्यवाहीचे निर्देश
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून खाटांची संख्या वाढवून ती ९० करण्यात आली आहे. तसेच, मुंब्रा परिसरातील स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम.एम. व्हॅली प्रसूतिगृहास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे विस्तारित केंद्र म्हणून अद्ययावत स्वरूपात सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
दररोज या रुग्णालयाच्या प्रसूती विभागात सुमारे २०० बाह्यरुग्ण येतात. सरासरी १८ ते २२ प्रसूती होत असून, बहुतांशवेळा सर्व खाटा भरलेल्या असतात. ठाणे शहरासह ग्रामीण व पालघर भागातील महिलादेखील येथे प्रसूतीसाठी येतात, त्यामुळे विभागावर सातत्याने ताण निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत विभागावरील ताण कमी करण्यासाठी उपाययोजना ठरविण्यात आल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट आणि अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान, दरमहा सुमारे १०० प्रसूतीपूर्व रुग्ण एम.एम. व्हॅली प्रसूतिगृहातून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविले जात असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी आपत्कालीन सिझेरियन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध झाल्यास मुख्य रुग्णालयावरील ताण कमी होईल, असे डॉ. बारोट यांनी सांगितले.
त्याअनुषंगाने, एम.एम. व्हॅली प्रसूतिगृहात आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्रीची व्यवस्था करून अद्ययावत प्रसूती विभाग सुरू करण्याचा आराखडा सोमवारी सादर करण्याचे आदेश आयुक्त राव यांनी दिले आहेत. त्यांनी हा विभाग छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विस्तारित केंद्र म्हणून त्वरित सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.