रांजणगावात गर्भलिंगनिदान रॅकेटचा पर्दाफाश; बीएएमएस डॉक्टरसह एजंट अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : रांजणगाव परिसरातील एका खासगी क्लिनिकमध्ये बेकायदेशीर गर्भलिंगनिदान केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात बीएएमएस डॉक्टर आणि एका एजंटला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई Ranjangaon येथील ‘लाईफ केअर क्लिनिक’मध्ये करण्यात आली.
या प्रकरणात आकाश सुभाष मलगुंडे (वय ३५, रा. धनगरवाडा, ढोकसंगवी, ता. शिरूर) आणि एजंट नरेंद्र साहेबराव ठाकरे (वय ५२, रा. समर्थ पार्क, केसनंद) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी डॉक्टर मोबाईलला वायफायने जोडलेल्या छोट्या प्रोबच्या सहाय्याने मोबाईल अॅपवरून सोनोग्राफी करून गर्भलिंगनिदान करत असल्याचे तपासात उघड झाले.
पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट-७ ला या बेकायदेशीर प्रकाराबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या पथकाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले आणि शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सचिन धस यांच्या सहकार्याने डमी महिला पेशंट तयार केली.
एजंट नरेंद्र ठाकरे याने डमी पेशंटला सरकारी वाहनाने रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कारेगाव येथे नेले. त्यानंतर खासगी वाहनातून तिला लाईफ केअर क्लिनिकमध्ये आणण्यात आले. पोलिसांनी लाईव्ह लोकेशनच्या माध्यमातून हालचालींवर लक्ष ठेवले होते. क्लिनिकमध्ये प्रत्यक्ष गर्भलिंग तपासणी सुरू असताना पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह छापा टाकून दोघांना रंगेहाथ पकडले.
छाप्यात क्लिनिकमध्ये तसेच एजंटच्या वाहनात गर्भलिंगनिदानासाठी वापरले जाणारे साहित्य आणि गर्भपातासाठी उपयोगात येणारी औषधे आढळून आली. सरकारी पंच आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
या कारवाईत एक वेंगनार गाडी, गर्भलिंगनिदानाचे साहित्य आणि औषधे असा एकूण ७ लाख ७३ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने केली.