विमाननगरमध्ये तरुणावर शस्त्राने वार; टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड – परिसरात दहशतीचे वातावरण
पुणे – विमाननगर भागातील खेसे पार्क परिसरात अल्पवयीनांच्या टोळक्याने एका तरुणावर शस्त्राने वार करत तीन रिक्षा आणि चार ते पाच दुचाक्यांची तोडफोड केल्याची घटना घडली. दहशत माजविण्यासाठी करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी संबंधित टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण २९ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास भावासोबत दुचाकीवरून जात असताना खेसे पार्क परिसरात पोहोचला. यावेळी टोळक्याने त्यांना अडवून शिवीगाळ केली व तीक्ष्ण शस्त्राने तरुणावर हल्ला केला. त्यानंतर टोळक्याने परिसरात उभ्या असलेल्या तीन रिक्षांच्या काचा फोडल्या तसेच जवळच्या सोसायटीत लावलेल्या पाच दुचाक्यांची तोडफोड केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे करत आहेत.
दरम्यान, २८ ऑक्टोबर रोजी वानवडी भागातील शिंदे वस्ती परिसरात देखील अशाच प्रकारे टोळक्याने दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली होती. शहरात गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ कारणावरून हाणामाऱ्या, शस्त्रासह हल्ले आणि वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी अशा टोळक्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.