पार्किंगच्या वादातून ज्येष्ठ कलावंत अशोक हांडे यांच्यावर हल्ला; माहीम पोलिसांकडून एकाला अटक

Spread the love

पार्किंगच्या वादातून ज्येष्ठ कलावंत अशोक हांडे यांच्यावर हल्ला; माहीम पोलिसांकडून एकाला अटक

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : वाहनतळाच्या (पार्किंग) किरकोळ वादातून ज्येष्ठ कलावंत आणि ‘मराठी बाणा’ महानाट्याचे निर्माते अशोक हांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून प्रकरणी माहीम पोलीस स्टेशन पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १ मार्च रोजी माटुंगा पश्चिम भागातील मनमाला टँक रोड परिसरात घडली. येथे युनायटेड हाऊस इमारतीच्या तळमजल्यावर अशोक हांडे यांचे कार्यालय आहे. ते कार्यालयात असताना परिसरात राहणारा प्रथमेश पांडुरंग उनफोडे उर्फ बंटी (वय ५३) हा हातात बॅट घेऊन त्यांच्या कार्यालयाजवळ आला. त्याने संतापाच्या भरात कार्यालयाच्या काचेवर बॅटने प्रहार करत गोंधळ घातला. आवाज ऐकून हांडे बाहेर आले असता वाद अधिक चिघळला.

कार्यालयाबाहेरील जागेत ‘मराठी बाणा’ कार्यक्रमासाठी वापरली जाणारी वाहने उभी केली जातात. या जागेवर वाहन उभी करण्याच्या कारणावरून आरोपीने पैशांची मागणी केल्याचे सांगितले जाते. मात्र, हांडे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी अधिकच संतापला. त्याने शिवीगाळ करत बॅटने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा बचाव करताना बॅट त्यांच्या कानाजवळ लागल्याने त्यांना दुखापत झाली. कार्यालयातील सहकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपी आक्रमकच राहिला.

दरम्यान, परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतरही आरोपीने पोलिसांशी वाद घालत त्यांच्याशी हुज्जत घातली. तसेच पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अशोक हांडे हे महाराष्ट्रातील लोककलेच्या जतनासाठी काम करणारे ज्येष्ठ कलावंत म्हणून ओळखले जातात. ‘मराठी बाणा’ या त्यांच्या महानाट्याचे देश-विदेशात सहा हजारांहून अधिक प्रयोग झाले असून या कार्यक्रमातून महाराष्ट्राची लोककला जगभर पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon