मुंबईतील पोलिस भरतीवेळी धावण्याच्या चाचणीत तरुणांकडून चलाखी; पवई पोलिस ठाण्यात ५ उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईत सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेमध्ये यावर्षीही उमेदवारांकडून वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात असल्याचे समोर आले आहे. १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत प्रत्यक्षात पूर्ण अंतर न धावता उमेदवार एखादी फेरी चुकवून वेळेआधीच पोहोचत असल्याचे उघडकीस आले आहे. आत्तापर्यंत पाच जणांनी अशी चलाखी करून चिपमध्ये कमी वेळ नोंदवली असून, याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात या उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबईसह राज्यभरात सध्या पोलिस भरती सुरू असून मुंबईच्या मरोळ येथील पोलिस मैदानात ही प्रक्रिया सुरू आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मैदानी चाचणीसाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, अचूक वेळ नोंदविण्यासाठी उमेदवारांच्या पायावर चीप बसवल्या जात आहेत. प्रत्यक्षात चाचणीवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. असे असतानाही निवड होण्यासाठी भावी पोलिसांकडून वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जात आहेत. १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत काही उमेदवार विक्रमी कमी वेळ नोंदवत असल्याचे परीक्षकांच्या लक्षात आले. त्यांना याबाबत संशय आल्याने चाचणीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तेव्हा काही उमेदवार चारशे मीटरच्या चार फेऱ्या मारण्याऐवजी एखादी फेरी न मारता थांबून ऐनवेळी पुन्हा धावत असल्याचे दिसून आले.
चार फेऱ्या न धावता विक्रमी वेळ नोंदविणाऱ्या उमेदवारांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून चाचपणी करण्यात आली. त्यात पाच उमेदवार ही चलाखी करताना आढळून आले. त्यानुसार ओमकार पवार, सुयश खाडे, ओमकार वांजुळ, सागर टिळे, दिनेश राठोड या उमेदवारांविरुद्ध पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उमेदवारांनी असा गैरप्रकार करायचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.