ठाणे परिमंडळ ०३ कल्याण पोलीसांकडून “एकता दौड” उत्साहात संपन्न
देशाच्या एकता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी धाव; नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था यांचा उत्स्फूर्त सहभाग
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालय परिमंडळ ०३ कल्याणच्या वतीने “एकता दौड – रन फॉर युनिटी” चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात नागरिक, शाळा-काॅलेज विद्यार्थी, पोलीस अधिकारी-अंमलदार, पोलीस मित्र, शांतता व दक्षता समिती सदस्य, रोटरी क्लब, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मा. अतुल झेंडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ०३) यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण-डोंबिवली विभागातील सर्व पोलीस ठाण्यांत एकता दौड, शस्त्र प्रदर्शन, सायबर जनजागृती व अंमली पदार्थ विरोधी मोहिमा राबविण्यात आल्या.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना पोलीस दलातील शस्त्रांचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांचा उपयोग व देखभाल याबाबत माहिती देण्यात आली. तसेच सायबर फसवणूक, फिशिंग लिंक, फसवे गुंतवणूक प्रस्ताव, ओटीपी फसवणूक अशा प्रकारांपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान युवकांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम समजावण्यात आले. ठिकठिकाणी फलक लावून “व्यसनमुक्त समाज” हा संदेश देण्यात आला.
कल्याण, डोंबिवली, मानपाडा, विष्णुनगर, खडकपाडा, कोळसेवाडी, टिळकनगर, बाजारपेठ व महात्मा फुले पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आयोजित धावांमध्ये एकूण हजारो नागरिक सहभागी झाले. दौडपूर्वी राष्ट्रीय एकता शपथ घेण्यात आली व शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.