“प्रेग्नंट जॉब”च्या आमिषाने पुण्यातील कंत्राटदाराची ११ लाखांची फसवणूक
सोशल मीडियावरील बनावट जाहिरातीचा नवा सायबर गुन्हा उघडकीस
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : “मला असा माणूस हवा जो मला प्रेग्नंट करू शकेल… २५ लाख रुपये देईन” अशा धक्कादायक जाहिरातीच्या आमिषाला बळी पडून पुण्यातील एका कंत्राटदाराची तब्बल ११ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.
तक्रारीनुसार, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पीडित कंत्राटदाराच्या मोबाईलवर “प्रेग्नंट जॉब” नावाचा व्हिडिओ पाठवण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये एक महिला म्हणताना दिसत होती, “मी अशी व्यक्ती शोधत आहे जी मला आई बनवेल; रंग, शिक्षण, जात मला महत्त्वाची नाही.” या व्हिडिओसोबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधताच एका व्यक्तीने स्वत:ला “प्रेग्नंट जॉब फर्म”चा सहाय्यक असल्याचे सांगून फसवणुकीचा खेळ सुरू केला.
या व्यक्तीने “महिलेसोबत राहण्यासाठी रजिस्ट्रेशन, ओळखपत्र आणि कायदेशीर प्रक्रिया आवश्यक आहे” असे सांगून विविध कारणांनी पैसे मागायला सुरुवात केली. रजिस्ट्रेशन फी, आयडी कार्ड, व्हेरिफिकेशन, जीएसटी, सिक्युरिटी डिपॉझिट अशा नावाखाली कंत्राटदाराकडून टप्प्याटप्प्याने एकूण ११ लाख रुपये वसूल करण्यात आले.
सुमारे दीड महिनाभर फसवणुकीचा हा सिलसिला सुरू राहिला. दरम्यान, ठगांनी पीडित व्यक्तीला कधी “प्रक्रिया सुरू आहे” असे खोटे आश्वासन दिले, तर कधी “नियम मोडल्यास केस होईल” अशी धमकी देत गप्प ठेवले. शेवटी जेव्हा कंत्राटदाराने प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा ठगांनी त्याला ब्लॉक केले. त्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
सायबर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, “प्रेग्नंट जॉब सर्व्हिस” या नावाने देशभरात २०२२ पासून अशा प्रकारच्या अनेक फसवणुका होत आहेत. पुरुषांना “महिलेला गर्भवती केल्यास लाखो रुपये मिळतील” असे आमिष दाखवले जाते आणि रजिस्ट्रेशन, वैद्यकीय तपासणी, कायदेशीर प्रक्रिया या कारणांखाली पैसे उकळले जातात.
बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि आता महाराष्ट्रातही अशा फसवणुकींची प्रकरणे समोर येत असून काही ठिकाणी आरोपींना अटकही झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या सोशल मीडिया जाहिरातींना बळी न पडण्याचे आणि कोणतीही संशयास्पद लिंक, संदेश किंवा ऑफर मिळाल्यास सायबर हेल्पलाइन १९३० किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे.