नवरात्रोत्सवासाठी मुंबई पोलिस सज्ज; सुरक्षेसाठी कडक उपाययोजना
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : नवरात्रोत्सव निर्विघ्न व शांततेत पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तयारी केली आहे. गरबा–दांडिया स्थळांवर महिलांच्या सुरक्षेस प्राधान्य देत आयोजकांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
संवेदनशील भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन, रात्रीची गस्त आणि साध्या वेशातील पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. महालक्ष्मी व मुंबादेवी मंदिर परिसरात विशेष बंदोबस्त ठेवला जाणार असून चोरी, छेडछाड तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्हीसह सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
उत्सव काळात सोशल मीडियावरून धार्मिक भावना भडकावणाऱ्या पोस्ट टाळाव्यात, असे आवाहनही पोलिसांनी केले असून सायबर पोलिसांकडून काटेकोर लक्ष ठेवण्यात येणार आहे.