कविता म्हणताना टाळ्या न वाजवल्याने चिमुकल्याला मारहाण; निर्दयी शिक्षिकेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल, पालकांनी दाखल केली पोलिस तक्रार
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर : उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात घडलेल्या एका संतापजनक प्रकाराने संपूर्ण शहर हादरले आहे. स्थानिक प्ले ग्रुपमध्ये शिकणाऱ्या अडीच वर्षांच्या निरागस चिमुकल्याला कविता म्हणताना टाळ्या न वाजवल्यामुळे शिक्षिकेने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालक संतापले असून त्यांनी थेट विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, या प्ले ग्रुपमध्ये शिक्षिका गायत्री पात्रा मुलांना कविता म्हणायला सांगत होत्या. कविता म्हणताना मुलांनी टाळ्या वाजवाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. मात्र एका अडीच वर्षांच्या बालकाने कविता म्हटली तरी टाळ्या वाजवल्या नाहीत. यावर पात्रा यांनी संतापून त्या चिमुकल्याला सलग तीन वेळा जोरदार कानाखाली मारले. अचानक झालेल्या या मारहाणीमुळे मुलगा घाबरून गेला आणि जोरात रडू लागला.
या प्रकाराची नोंद प्ले ग्रुपमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली. नंतर कोणीतरी याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो थेट मुलाच्या पालकांपर्यंत पोहोचवला. व्हिडीओ पाहून पालकांनी संताप व्यक्त करत तातडीने पोलिसांत धाव घेतली. पालकांनी हा व्हिडीओ पुरावा म्हणून पोलिसांना सादर केला असून आरोपी शिक्षिकेविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीची गंभीर दखल घेत विठ्ठलवाडी पोलिसांनी शिक्षिका गायत्री पात्रा हिच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३२३ (मारहाण) व अल्पवयीन मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा शैक्षणिक संस्थांतील मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या अमानुष कृत्यांना आळा घालण्यासाठी कठोर नियम लागू करण्याची मागणी पालकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.