मकोकातून सुटताच अरविंद सोढाचा दहशतवाद पुन्हा बळावला; चेंबूरमध्ये गुंडांची हफ्तेवसुली सुरू
मुंबई : चेंबूर-टिळक नगर परिसरात गुन्हेगारी जगतात नावाजलेला कुख्यात गुंड अरविंद सोढा काही दिवसांपूर्वी मकोकाची शिक्षा भोगून ठाणे जेलमधून बाहेर आला आहे. तो सध्या नवी मुंबईतील नेरुळ येथे वास्तव्यास असला तरी त्याचे गुंड पुन्हा सक्रिय झाल्याने चेंबूर परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८०-९० च्या दशकात डी कंपनी, नाना कंपनी आणि डॅडी कंपनीच्या नावाने खंडणीवसुली होत असे. आता चेंबूर उपनगरात अरविंद सोढाच्या नावाने पुन्हा खंडणीची वसूली सुरू झाल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली आहे. दोन वेळा मकोकाची शिक्षा भोगून बाहेर आलेला सोढा पुन्हा जुन्याच धंद्यात गुंतल्याचे समजते.
चेंबूरमधील पी. एल. लोखंडे मार्गावरील कादरिया नगर, साई इंडस्ट्रीज आणि नागवाडी परिसरातील काही गुंड सोढाच्या संपर्कात आहेत. यातील अनेक गुंडांचे नाव, पत्ता व इतर तपशील तिलकनगर पोलीस, डीसीपी स्क्वॉड तसेच गुन्हे शाखा युनिट ६ यांच्या अधिकार्यांकडे असल्याचे कळते. सूत्रांच्या माहितीनुसार, सोढाच्या नावावरून स्थानिक व्यापाऱ्यांकडून हफ्तेवसुली सुरू असून त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
तसेच, नागवाडी परिसरातील काही महिला देखील या रॅकेटमध्ये गुंतल्याचे समोर आले आहे. त्या महिलांना सोढाकडून दरमहा पैसे दिले जात असून पोलिसांनी त्यांच्या हालचालींवरही लक्ष केंद्रित केले आहे.
या संदर्भात तिलकनगर विभागातील एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, “अरविंद सोढा व त्याचे साथीदार पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांनी काहीही गैरकृत्य केल्यास अथवा व्यापाऱ्यांकडून तक्रार आल्यास तातडीने कारवाई करून त्यांना जागा दाखवली जाईल.”
पोलिसांनी आधीच या टोळीच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्याची तयारी केली असून व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.