सोशल मीडियावरून जाळ्यात अडकवून खंडणी उकळणारी तरुणी अखेर गुन्हेगार ठरली
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : सोशल मीडियावरून ओळख वाढवून तरुणांना जाळ्यात अडकवून शारीरिक संबंध ठेवून नंतर बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या एका तरुणीविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड आणि कंधारसह पुण्यातील तीन तरुणांना या तरुणीने अशा प्रकारे ब्लॅकमेल केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आंबेगाव येथील ३१ वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आळंदी रोडवरील म्हस्के वस्ती येथे राहणाऱ्या या तरुणीशी त्याची सोशल मीडियावर ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर त्या तरुणीने गोड बोलून त्याला आपल्या घरी बोलावले व स्वखुशीने शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्यानंतर बलात्काराची खोटी केस दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून रोख रक्कम आणि वस्तू मिळून एकूण १ लाख ७२ हजार ६६४ रुपयांची खंडणी उकळली. इतकेच नव्हे तर आणखी ५ लाख रुपयांची मागणी केली.
फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर या तरुणीने ८ फेब्रुवारी २०२५ रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि अॅट्रोसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पीडित तरुणाने चौकशी सुरू केली असता या तरुणीने यापूर्वीही अशाच पद्धतीने २०१७ मध्ये नांदेड व २०२२ मध्ये कंधार येथील तरुणांना जाळ्यात अडकवून खंडणी उकळल्याचे उघड झाले. या तिघांवरही बलात्कार आणि अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ही सर्व प्रकरणे खोटी असून खंडणी उकळण्यासाठीच ही कारस्थाने रचल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकारामुळे समाजात मोठी खळबळ उडाली असून अशा प्रकारे शरीराचा वापर करून खंडणी उकळणाऱ्या महिलांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड करीत आहेत.