काशिमिरातील पाच बारवर छापा; नियमभंग केल्याने गुन्हे दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मिरा-भाईंदर : काशिमिरा परिसरात नियम धुडकावून पहाटेपर्यंत सुरू असणाऱ्या बारवर मंगळवारी मध्यरात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यंत गुन्हे शाखा-१च्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. या वेळी पाच बारवर छापा टाकून त्यांच्या विरोधात काशिमिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरा-भाईंदर परिसरातील हॉटेल आणि बार चालकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या. बारसाठी मध्यरात्री दीडपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली असतानाही काही बार पहाटेपर्यंत सुरू असल्याचे आढळून आले. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान सारंग, स्वागत, नाईट मीटिंग, समाधान, चेरीश हे पाच बार पहाटेपर्यंत सुरू असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित बार चालकांविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.
हॉटेलच्या बेकायदा बांधकामावर तोडक कारवाई
काशिमिरा परिसरातील एका हॉटेलचे बेकायदा बांधकाम पूर्वी महापालिकेकडून पाडण्यात आले होते. मात्र, संबंधित हॉटेल चालकांनी पुन्हा अनधिकृत बांधकाम उभारले. त्यामुळे बुधवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने त्या हॉटेलवर तोडक कारवाई केली.
या कारवाईवरून पालिका अधिकाऱ्यांवर संगनमताचे आरोप होत असल्याने चौकशी केली जाणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त कल्पिता पिंपळे यांनी दिली. या कारवायांमुळे काशिमिरा परिसरातील बेकायदा व्यवसायांवर आळा बसेल का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.