बनावट ऍपच्या लिंकवरून सहा लाखांची फसवणूक; अंबरनाथ आणि बदलापूरात दोन गुन्हे दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
बदलापूर : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, नव्या प्रकारे नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. व्हॉट्सअपवर आलेल्या बनावट ऍपच्या लिंकवरून तब्बल सहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची दोन स्वतंत्र प्रकरणे बदलापूर व अंबरनाथमध्ये घडली आहेत. या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, नागरिकांनी अशा संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंबरनाथ पूर्वेतील एका व्यक्तीच्या मोबाईलवर युनियन बँक ऑफ इंडियाचे बोधचिन्ह असलेला संदेश आला. संदेशामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून बँकेचे ऍप सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र ते ऍप बनावट असल्याचे समोर आले. संबंधिताने दिलेल्या माहितीनुसार, या ऍपद्वारे त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ९८ हजार ९९३ रुपये काढण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधला असता संपूर्ण प्रकरण उघड झाले. त्यानंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत बदलापूरमधील एका व्यक्तीच्या मोबाईलवर परिवहन विभागाचे बनावट चलन आले. ते चलन भरताना गुगल पेच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या खात्यातून १ लाख ८९ हजार रुपये वळवण्यात आले. फसवणुकीची कल्पना आल्यानंतर तक्रारदाराने बदलापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी राजा राम, शाबाझ खान, दीपक कुमार शॉ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही प्रकरणांनंतर नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बँक, परिवहन विभाग किंवा कोणतीही शासकीय यंत्रणा कधीही व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियाद्वारे लिंक पाठवत नाही. त्यामुळे अशा लिंकवर क्लिक न करण्याचे, तसेच शंका आल्यास त्वरित बँक किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.