लाच घेताना श्रीगोंदा पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात; २० हजारांवरून ३ हजारांत तडजोड
पोलीस महानगर नेटवर्क
श्रीगोंदा – कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेत कार्यरत असताना लाचखोरीच्या मार्गाने वैयक्तिक फायद्यासाठी वागताना श्रीगोंदा पोलीस ठाण्याचा एक पोलीस कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडला. वीस हजार रुपयांची मागणी करून अखेरीस तीन हजार रुपयांवर तडजोड करून लाच स्वीकारताना पोलिसांनी त्याला पकडले. लाच घेणाऱ्या कॉन्स्टेबलचे नाव संभाजी शिवाजी घोडे (वय ३२, रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे आहे.
तक्रारदार आपल्या कुटुंबासह श्रीगोंदा येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलाच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कॉन्स्टेबल घोडे यांनी तक्रारदारांच्या मुलाला पोलीस स्टेशनला बोलावले. यावेळी तक्रारदारदेखील स्टेशनला गेले होते. संबंधित प्रकरणात तक्रारदारांनी अर्ज करणाऱ्या व्यक्तींशी चर्चा करून वाद मिटविला होता. तथापि, घोडे यांनी तक्रारदारांच्या मुलाचा मोबाईल ताब्यात ठेवत, “मी तुमच्या मुलावर गुन्हा दाखल होऊ दिला नाही, प्रकरण मिटवून दिले. मोबाईल परत हवा असेल तर मला २०,००० रुपये द्या,” अशी मागणी केली. लाच देण्यास नकार देत तक्रारदारांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे तक्रार नोंदवली.
तक्रारीनुसार ११ व १२ ऑगस्ट २०२५ रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी घोडे यांनी प्रकरण मिटविण्याच्या बदल्यात ३,००० रुपये घेण्याची तयारी दर्शवली. ठरल्याप्रमाणे आज (१२ ऑगस्ट) सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान घोडे यांनी तक्रारदारांकडून स्वतः ३,००० रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर त्यांना लाच रकमेसह जागीच अटक करण्यात आली. घोडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे श्रीगोंद्यात खळबळ उडाली आहे, तर प्रामाणिक नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यास पुढाकार घ्यावा, असा संदेश यामुळे पुन्हा अधोरेखित झाला आहे.