२०१८ च्या एका प्रकरणात दोषी ठरवत बच्चू कडूंना ३ महिने तुरूंगवासाची शिक्षा अन् १०,०००दंड
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – माजी मंत्री बच्चू कडू उर्फ ओमप्रकाश कडू यांना २०१८ च्या प्रकरणात तीन महिने तुरूंगवास आणि १०,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनवण्यात आली आहे. मुंबईतील सत्र न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्याचा कामात अडथळा आणला आणि धमकी दिल्याबाबत त्यांना दोषी ठरवले आहे. २०१८ मधील हे प्रकरण असून,आयएएस अधिकारी प्रदीप यांच्यात आणि बच्चू कडू यांच्या राडा झाला होता. मरीन लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. मुंबईतील सत्र न्यायालयाने या प्रकरणी दोषी ठरवले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी बच्चू कडू यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. उच्च न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत त्यांची शिक्षा निलंबित ठेवण्यात आली आहे आणि त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कडू यांना कलम ३५३ (एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या कर्तव्यापासून रोखण्यासाठी त्याच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी स्वरूपाची शक्ती वापरणे) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. मात्र, न्यायालयाने त्यांना हेतुपुरस्सर अपमान करण्याच्या आरोपातून मुक्त केले.
न्यायालयाने म्हटले आहे की, ‘शासन किंवा एखाद्या विभागाच्या व्यवस्थापनाबद्दल किंवा सरकारच्या भरती प्रक्रियेदरम्यान परीक्षा घेण्याबाबत तक्रारी असू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की लोकांचा कोणताही प्रतिनिधी अशा अधिकाऱ्याकडे जाईल आणि त्याच्यावर हिंसक हल्ला करेल, त्याला धमकावेल आणि त्याचे काम थांबवेल. न्यायाधीश म्हणाले, ‘फक्त आरोपी आमदार आहे, म्हणून त्याला कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला धमकावण्याचा किंवा त्याच्या कार्यालयात हल्ला करण्याचा परवाना नाही.’ ही घटना २६ सप्टेंबर २०१८ रोजी घडली, जेव्हा तत्कालिन आमदार आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक कडू यांनी मुंबईतील माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे तत्कालीन संचालक आयएएस अधिकारी प्रदीप पी यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. एस.पी.एस.सी परीक्षा घेणारे महापोर्टलमधील त्रुटीसंबंधी जाब विचारण्यास गेले होते. बच्चू कडू आणि तत्कालिन महाराष्ट्र राज्य संचालक असलेले पी प्रदीप यांच्यात वाद झाला. त्यानंतर कडूंनी आयपॅड प्रदीप यांच्यावर उगारला होता. त्यासंबंधी पी प्रदीप यांनी तक्रार दाखल केली होती.