२९ हजारांची लाच घेताना महावितरणचा सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा

Spread the love

२९ हजारांची लाच घेताना महावितरणचा सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क 

जळगाव – सौरऊर्जा प्रकल्पांच्या रिलीज ऑर्डरसाठी २९ हजार रुपयांची लाच घेताना पाचोरा-२ उपविभागातील महावितरणचे सहाय्यक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (वय ३८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. १२ ऑगस्ट) त्यांच्या कार्यालयातच रंगेहात पकडले. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे सौर पॅनेल फिटिंगच्या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी अलीकडेच तीन नवीन प्रकरणांची कागदपत्रे ऑनलाईन सबमिट केली होती. या तीन प्रकरणांच्या रिलीज ऑर्डरसाठी मोरे यांनी प्रत्येकी ३,००० रुपये दराने एकूण ९,००० रुपयांची लाच मागितली.

याशिवाय, यापूर्वी तक्रारदारांच्या २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून दिल्याचे कारण देत, प्रत्येकी २,५०० रुपये दराने ७०,००० रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी तक्रारदारांनी आधीच ३०,००० रुपये अदा केले होते. उर्वरित ४०,००० रुपयांपैकी पहिल्या हप्त्याचे २०,००० रुपये आणि सध्याच्या तीन प्रकरणांसाठीचे ९,००० रुपये – अशी एकूण २९,००० रुपयांची मागणी मोरे यांनी केली होती. लाच देण्यास इच्छुक नसलेल्या तक्रारदारांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. पडताळणीनंतर, मंगळवारी (१२ ऑगस्ट) नियोजित सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान मोरे यांनी स्वतः लाच रक्कम स्वीकारली आणि त्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जागीच ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, सहायक पोलिस निरीक्षक राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर आणि चालक सुरेश पाटील यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे महावितरण विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून, व्यवसायिक व नागरिकांकडून एसीबीच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon