पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रचंड प्रतिसाद; २०० हून अधिक पत्रकार व कुटुंबीयांनी घेतला लाभ

Spread the love

पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रचंड प्रतिसाद; २०० हून अधिक पत्रकार व कुटुंबीयांनी घेतला लाभ

सुरेश गायकवाड / मुंबई 

मुंबई -अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन पत्रकार विभाग आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात सुमारे २०० पेक्षा अधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेत वैद्यकीय तपासण्यांचा लाभ घेतला. या शिबिराचे उदघाटन रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थचे अध्यक्ष कमल चोक्सी यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने फीत कापून करण्यात आले. यावेळी क्लबचे सचिव डॉ.गिरीश वालावलकर, उपाध्यक्ष अशोक दोशी, माजी अध्यक्षा नफीसा खोराकीवाला, फिरोज कच्छवाला, सदस्या रसिदा अनिस, माधवी तन्ना, नर्गिस गौर, तसेच वोक्हार्ट फाउंडेशनच्या डायरेक्टर समिना खोराकीवाला, व्यवस्थापक जितेश रांभिया आणि अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे (पत्रकार विभाग )अध्यक्ष सुभाष देसाई उपस्थित होते.

शिबिरात विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये हृदयविकार व रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, ईसीजी, रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी, नेत्र तपासणी, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैयक्तिक सल्ला यांचा समावेश होता. तपासणीनंतर गरजूंना मोफत औषधांचे वाटप आणि चष्म्यांचे वितरणही करण्यात आले. आरोग्य सेवेत सहभाग घेतलेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी अत्यंत समर्पित भावनेने उपस्थित पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची सेवा केली. संपूर्ण शिबिर अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

पत्रकारांच्या व्यस्त आणि तणावपूर्ण दिनचर्येमध्ये वेळेवर आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे, यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही अशाच स्वरूपाची शिबिरे राबवली जातील, अशी ग्वाही वोक्हार्ट फाउंडेशनच्या समिना खोराकीवाला यांनी दिली.

पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, भविष्यात अधिक व्यापक प्रमाणावर अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ, वोक्हार्ट फाउंडेशन आणि अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन (पत्रकार विभाग ) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभाष देसाई, मुंबई अध्यक्ष रमेश औताडे, उपाध्यक्ष नरेंद्र घोलप, महासचिव शिरिष वानखेडे, सचिव सुरेश गायकवाड, संघटक चिटणीस अल्पेश म्हात्रे, कार्यकारणी सदस्य सुरेश ढेरे, सुबोध शाक्यरत्न यांच्या संयुक्त पुढाकारामुळे हा आरोग्य उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon