नवीन क्रेडिट कार्डच्या आमिषाने पावणेपाच लाखांची ऑनलाइन फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : नवीन क्रेडिट कार्ड देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ५० वर्षीय नागरिकाची पावणेपाच लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. एपीके (APK) फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडून संबंधिताच्या बँक खात्यातून ४ लाख ७३ हजार रुपये परस्पर वर्ग करून घेण्यात आले. ही घटना १८ जुलै २०२५ रोजी कोथरूड येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोथरूड परिसरात वास्तव्यास आहेत. १८ जुलै रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून नवीन क्रेडिट कार्ड देण्याची बतावणी केली. त्यानंतर मोबाईलवर एपीके फाईल पाठवून ती डाउनलोड करण्यास भाग पाडण्यात आले. फाईल डाउनलोड झाल्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्यातील व्यवहारांवर चोरट्यांनी ताबा मिळवत काही वेळातच ४ लाख ७३ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने वर्ग करून घेतले.
खात्यातून मोठी रक्कम कमी झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने तात्काळ वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी करत आहेत. सायबर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.