गोव्यातून पिस्तूल आणून मालवणी परिसरात विक्रीसाठी आलेल्या इसमाला अटक; मालवणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई
मुंबई – गोव्यातून बेकायदेशीर पिस्तूल आणून ते मालवणी परिसरात विक्रीसाठी घेऊन आलेल्या इसमाला मालवणी पोलिसांच्या निगराणी पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा टळला. दिनांक ११ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ८:०५ वाजता, मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, निगराणी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की म.वा. देसाई मैदानाजवळ फुटपाथवर एक इसम पँटच्या मागील भागात पिस्तूल लपवून फिरत आहे.
सदर माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. खबर्याच्या इशाऱ्यानुसार संशयित व्यक्तीकडे लक्ष वेधले गेले. पोलिसांनी दक्षतेने कारवाई करत त्याला पळून जाण्यापूर्वीच रस्त्याच्या कडेला ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडून भारतीय बनावटीचे एक सिल्वर व काळ्या रंगाचे पिस्तूल (किंमत अंदाजे रु. ७५,०००/-) आणि चार जिवंत काडतुसे (किंमत अंदाजे रु. ४,०००/-) हस्तगत करण्यात आली. तपासादरम्यान उघड झाले की, आरोपी हे पिस्तूल गोव्यातून आणून मालवणी परिसरात विक्रीसाठी घेऊन आला होता. अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आरिफ इस्माईल शहा (वय ३५ वर्षे, रा. मु.पो. ता. खेड, जि. रत्नागिरी) असे आहे. या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८८४२/२०२५ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ आणि मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७(१)(अ), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मिना, पोलीस उप आयुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईमध्ये पो.उ.नि. डॉ. दीपक हिंडे, पो.ह. अनिल पाटील, पो.ह. जगदीश घोसाळकर, पो.शि. सुनिल पाटील, पो.शि. सचिन वळतकर, पो.शि. मुदस्सिर देसाई, पो.शि. समित सोरटे, व पो.शि. कालीदास खडे यांचा समावेश होता. मालवणी पोलिसांच्या या तत्परतेमुळे बेकायदेशीर शस्त्र विक्रीचा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले असून परिसरातील नागरिकांनीही पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.