पोलीसांकडून फक्त निराशा! अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी अखेर रोहित पवारांनी मागितली राज ठाकरेंची मदत; मराठी दिनानिमित्त पोहोचले शिवतीर्थ
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिन असून महाराष्ट्रात मराठी माणसाची तक्रार पोलिसांकडून दाखल केली जात नाही, ही व्यथा रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्याकडे मांडली. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी नीट केली जात नाही. विमान कंपनीवर गुन्हा दाखल केला जात नाही. हा लढा लढण्यासाठी मनसेने पाठिंबा द्यावा, यासाठी रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं? याबाबत सविस्तर माहिती दिली.
रोहित पवार म्हणाले की, राज ठाकरे यांनी वेळ दिली. त्यांनी मला विचारले होते की, नेमका विषय काय आहे, त्यावेळी मी त्यांना सांगितले की, अजित दादांचा अपघात, घातपाताविषयी मला माहिती द्यायची आहे. दादांचा विषय असल्यामुळे त्यांनी मला लगेच वेळ दिला. सव्वा तास राज ठाकरेंची भेट झाली. त्यांनी सर्व घटना समजून घेतल्या. मी जी माहिती घेऊन गेलो होतो ती त्यांनी समजून घेतली. त्यांनी सांगितलं की, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एफआयआर पोलिसांनी का घेतला नाही? त्यांचा अभ्यास चांगला असल्याने त्यांनी मला सुप्रीम कोर्टाचे दोन दाखले दिले. ज्यात अक्सीडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यास एफआयआर घेतलाच पाहिजे. दुसरा दाखला म्हणजे काही झाले तरी पोलिसांना एफआयआर घ्यावाच लागतो, असे राज ठाकरेंनी म्हटल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
रोहित पवार पुढे म्हणाले की, त्यांनी एकच प्रश्न केला की, महाराष्ट्रात एका व्यक्तीचा एफआयआरच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेतील हे आपल्याला येत्या काही काळात दिसेल. पण, त्यांनी सांगितले की दादांना मी ओळखत होतो आणि आम्ही जवळून काम केले आहे. जेव्हा कधी आमची भेट व्हायची तेव्हा आम्ही बोलायचो. मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू.
आज राज ठाकरेंना भेटत असताना योगायोगाने मराठी भाषा दिन आहे. मराठी माणसासाठी राज ठाकरे आजपर्यंत लढत आलेले आहेत. दादांचा मुद्दा घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मदतीने व आपण स्वतः या विषयाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी ताकद आणि पाठिंबा द्यावा, अशी विनंती आम्ही त्यांना केली. यावर विचारायचे कारण नाही, मी नक्कीच दादांसोबत असणार आहे. न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करेन, असे राज ठाकरेंनी म्हटल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.