साकीनाक्यात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; २३.८९ लाखांच्या ११ स्पोर्ट्स बाईक जप्त, दोन सराईत अटकेत

Spread the love

साकीनाक्यात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; २३.८९ लाखांच्या ११ स्पोर्ट्स बाईक जप्त, दोन सराईत अटकेत

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : साकीनाका पोलीस ठाणे येथील मोटार वाहन चोरीविरोधी पथकाने मोठी कारवाई करत स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक केली. या कारवाईत तब्बल २३ लाख ८९ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून मुंबई शहर व उपनगरातील एकूण १५ गुन्ह्यांचा छडा लागला आहे.

२२ नोव्हेंबर २०२५ रोजी अंधेरी–घाटकोपर लिंक रोडवरील साकीनाका परिसरात रस्त्याच्या कडेला पार्क केलेली Royal Enfield इंटरसेप्टर ६५० दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मिराज उर्फ बवाल मोहम्मद रईस खान (वय २६) याला ठाणे येथून अटक केली.

चौकशीत त्याचा साथीदार उमेर आमीन शेख (वय २०) याचाही सहभाग उघडकीस आला. त्याला राजस्थानमधील अजमेर येथून ताब्यात घेण्यात आले. तपासात आरोपींनी Royal Enfield तसेच Yamaha कंपनीच्या विविध मॉडेलच्या एकूण ११ दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये इंटरसेप्टर ६५०, हंटर ३५०, बुलेट ३५०, तसेच यामाहा एमटी-१५ आणि आर-१५ या मॉडेल्सचा समावेश आहे.

या दोघांकडून साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १०, तर व्ही. बी. नगर, कुर्ला, सायन आणि धारावी पोलीस ठाण्यांतील ५ असे एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास साकीनाका पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) परमजित सिंह दहिया, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० दत्ता नलावडे आणि सहायक पोलीस आयुक्त साकीनाका विभाग प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील यादव व पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन पाटील यांच्या देखरेखीखाली मोटार वाहन चोरीविरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon