लखाने शिवारात बनावट देशी-विदेशी मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; १४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
मालेगाव – लखाने गावच्या शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे चालणाऱ्या देशी व विदेशी बनावट मद्यनिर्मितीच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत १४ लाख ५१ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाला लखाने शिवारात अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच, मालेगाव विभागाचे निरीक्षक लीलाधर पाटील, दुय्यम निरीक्षक सागर नलवडे, रियाज शेख तसेच कळवण विभागाचे निरीक्षक सी. एच. पाटील व आर. जे. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
कारखान्याच्या शेडमध्ये बनावट देशी-विदेशी मद्य, रिकाम्या आणि भरलेल्या बाटल्या, बनावट स्टिकर्स, मद्यनिर्मितीसाठी लागणारे साहित्य, तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे पिकअप वाहन (एमएच-१८-एम- ३६८०) आणि दुचाकी (एमएच-९८-एआर-६४१८) असा एकूण १४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष बाब म्हणजे या शेडमध्ये काय सुरू आहे याची माहिती गावकऱ्यांनाही नव्हती. छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात बनावट देशी-विदेशी मद्य व स्टिकर्स आढळून आले. या प्रकरणात बनावट मद्यसाठा निर्माण करणारे, साठवणूक करणारे, वाहतूक करणारे, पुरवठादार आणि वाहन मालक यांच्यासह अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.