डोंबिवली गुंतवणूक फसवणूक प्रकरण; ७८ गुंतवणूकदारांची ३.७ कोटींची फसवणूक, आठ जणांवर गुन्हा दाखल

Spread the love

डोंबिवली गुंतवणूक फसवणूक प्रकरण; ७८ गुंतवणूकदारांची ३.७ कोटींची फसवणूक, आठ जणांवर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क 

डोंबिवली – राज्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच डोंबिवलीत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आकर्षक नफ्याचे आमिष दाखवत तब्बल ७८ नागरिकांची सुमारे ३ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावर असलेल्या एका सोसायटीमधील गुंतवणूक योजनेच्या कार्यालयात घडली. यामध्ये कार्यरत भागीदार व कर्मचाऱ्यांनी विविध योजना आणि नफ्याचे वचन देत नागरिकांकडून रक्कम गोळा केली. मात्र, ठरल्याप्रमाणे ना नफा दिला, ना मूळ रक्कम परत केली. या प्रकरणी सुभाष रोड, कुंभारखाणपाडा, डोंबिवली पश्चिम येथे राहणारे महेश रमेश भोईर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार संशयितांची नावे गौरम राम भगत, विकीन वसंत पटणे, देवेंद्र यशवंत तांबे, परेश हनुमान भोईर, दर्शन ज्ञानेश्वर म्हात्रे, दीपेश दत्ताराम दांडेकर, अर्चना कळंगे व गीता ठक्कर आहेत. या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू असून आणखी काही पीडित गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे डोंबिवली परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी अशा योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

तक्रारदार महेश रमेश भोईर डोंबिवलीत वाहन धुलाई केंद्र चालवतात. मे २०२१ ते जुलै २०२२ या वर्षभराच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. बापूसाहेब फडके रस्त्यावरील आनंदी आनंद सोसायटीच्या दुसऱ्या माळ्यावरील कार्यालय आणि डोंबिवली पश्चिमेत सुभाष रस्त्यावरील पुष्पहास सोसायटीतील मेसर्स फिनिक्स इन्व्हेस्टमेंट व मेसर्स फिनिक्स फायनान्शियल सोल्युशन एल. एल. पी. कार्यालयात हे फसवणुकीचे प्रकार घडले आहेत, असे महेश भोईर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणाला अटक करण्यात आले नाही, असे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार महेश रमेश भोईर यांनी पोलीस ठाण्यातील प्राथमिक तपासणी अहवालात दिलेली माहिती, अशी की फिनिक्स इन्व्हेस्टमेंट डोंबिवली पूर्व, पश्चिमेत कार्यालयात आहेत. १ मे २०२१ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत मे. फिनिक्स इन्व्हेस्टमेंटच्या भागीदार संस्थांचे पदाधिकारी आणि या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपली व आपल्या सारख्या इतर ७७ गुंतवणूकदार यांना झटपट चांगला नफा मिळवून देणाऱ्या आकर्षक गुंतवणूक योजनांची माहिती दिली. कमी कालावधीत अधिकचा परतावा मिळतो म्हणून डोंबिवली परिसरातील ७८ ग्राहकांनी मे. फिनिक्सच्या गुंतवणूक योजनेत एकूण तीन कोटी ७० लाखाच्या रकमा गुंतवल्या.

गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक योजनांची इंग्रजी भाषेतील प्रमाणपत्रे दिली. त्यामुळे आपली गुंतवणूक सुरक्षित आणि खात्रीलायक असल्याचे ग्राहकांना सुरुवातीला वाटले. गुंतवणूक योजनेची मुदत संपल्यावर ग्राहकांना विहित वेळेत नफा मिळणे आवश्यक होते. तो गुंतवणूक कंपनीकडून देण्यात आला नाही. त्यानंतर गुंतवणूकदारांनी संबंधित पदाधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणे सुरू केले. त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. नफा नाही पण आमची मूळ रक्कम परत करा असा तगादा गुंतवणूकदारांनी लावण्यास सुरूवात केली. त्यालाही अपेक्षित प्रतिसाद गुंतवणूक कंपनीच्या भागीदारांकडून मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर गुंतवणूकदारांनी महेश भोईर यांच्या पुढाकाराने रामनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीची तक्रार केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नरळे या प्रकरणाचा तपास करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon