मद्यावरील करवाढीच्या निर्णयानंतरही दारू कंपन्यांच्या शेअर्समध्ये १७% पर्यंत उसळी
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – महाराष्ट्र सरकारने भारतीय बनावटीच्या परदेशी दारूवर उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला असतानाही, काही मद्य कंपन्यांच्या शेअर किमतींनी आज शेअर बाजारात जोरदार उसळी घेतली. विशेष म्हणजे जीएम ब्रुअरीज आणि सुला वाइनयार्ड्स या कंपन्यांचे शेअर्स तब्बल १७ टक्क्यांपर्यंत वाढले, तर दुसऱ्या बाजूला युनायटेड स्पिरिट्स आणि अलाइड ब्लेंडर्स यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स ६ टक्क्यांपर्यंत घसरले. राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क वाढीच्या निर्णयामुळे संपूर्ण मद्य उद्योगावर परिणाम होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा वेगळा प्रतिसाद दिला. गुंतवणूकदारांनी काही ठराविक कंपन्यांच्या आगामी नफ्यात वाढ होण्याची शक्यता ओळखून त्यात गुंतवणूक वाढवली.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जीएम ब्रुअरीज आणि सुला वाइनयार्ड्स यांचे व्यवसाय मॉडेल, उत्पादन पोर्टफोलिओ आणि विक्रीचे भौगोलिक स्वरूप हे असे घटक आहेत, जे त्यांना या करवाढीतून कमी परिणाम होईल असे दर्शवतात.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता आहे, पण ग्राहकांसाठी मद्याचे दर वाढण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्क रचना उत्पादन खर्चाच्या ३ पट वरून ४.५ पट वाढवली आहे. यामुळे,देशी दारूवरील उत्पादन शुल्क प्रति प्रूफ लिटर १८० रुपयांवरून २०५ रुपये प्रति प्रूफ लिटर करण्यात आले आहे. या बदलाचा परिणाम सर्व श्रेणीतील दारूच्या किमतींवर होईल. सध्या, १८० मिलीच्या देशी दारूच्या बाटलीची किंमत ८० रुपये आहे. तर महाराष्ट्रात बनवलेल्या दारूची किंमत १४८ रुपये आहे आणि आयएमएफएल आणि प्रीमियम परदेशी ब्रँडची किंमत २०५ ते ३६० रुपयांच्या दरम्यान आहे.
जीएम ब्रुअरीजचे शेअर्समध्ये तेजी का ?
जीएम ब्रुअरीजची गणना भारतातील आघाडीच्या मद्य कंपन्यांमध्ये केली जाते आणि महाराष्ट्राच्या या नवीन धोरणाचा फायदा कंपनीला होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने २०२५ च्या वार्षिक अहवालात म्हटले होते की महाराष्ट्रातील एकूण देशी दारू उत्पादन शुल्कात त्यांचे योगदान २५-३०% आहे. राज्यातील ब्रँडसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया कंपनीला स्पर्धात्मक धार देऊ शकते असे बाजाराचे मत आहे.
सुला वाइनयार्ड्स
या उत्पादन शुल्क वाढीचा वाइनवर कोणताही परिणाम होणार नसल्याने बऱ्याच काळापासून खराब कामगिरी करणाऱ्या सुला वाइनयार्ड्सच्या शेअर्समध्येही १३% वाढ झाली. महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे वाइन उत्पादक राज्य आहे आणि सुला या श्रेणीतील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. याशिवाय, बिअरवरील शुल्कात वाढ न झाल्यामुळे युनायटेड ब्रुअरीजच्या शेअर्समध्येही थोडीशी वाढ झाली. बाजाराला अपेक्षा आहे की प्रीमियम सेगमेंटमधील ग्राहक आता स्पिरिट्सपासून बिअरकडे वळतील.