देशभरात आज मॉक ड्रिल
देशातील २४४ प्रमुख जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन; महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांचा समावेश
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – भारत सरकारने पाकिस्तानविरोधात तलवार उपसली आहे. काश्मीर पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कुरघोडी सुरूच आहे. भारताकडूनही याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. आता मात्र भारत-पाक संघर्षाचं युद्धात रुपांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी केंद्र सरकारकडून आज ७ मे रोजी मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील २४४ प्रमुख जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये होणार मॉक ड्रिल- मुंबई, उरण, तारापूर,ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, थळ वायशेत , पिंपरी-चिंचवड,छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी होणार मॉक ड्रिल.नाशिक, मनमाड आणि सिन्नरमध्ये होणार मॉक ड्रिल नाशिक, सिन्नरला असणाऱ्या लष्करी छावण्या, मनमाडला असणारा पेट्रोलियम डेपोमुळे तीन ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, सार्वजनिक ठिकाणं, शाळा, रेल्वे स्टेशन, बस आणि गर्दीच्या भागात मॉक ड्रिल किंवा अभ्यास ड्रिल करण्यात येईल. आपत्कालिन परिस्थितीत सर्वसामान्य जनता, सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षा दलांची तयारी कशी आहे याची पडताळणी करणे हा यामागील उद्देश आहे. पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने भारताच्या तीनही सेना दलांनी तयारीही पूर्ण केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना उद्या मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी घेण्यासाठी हा मॉक ड्रिल घेतला जाणार आहे. राज्यांनी पोलrस, नागरी संरक्षण यंत्रणा, आरोग्य विभाग आणि अन्य आपत्कालीन सेवांशी संबंधित यंत्रणांना तत्पर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.