बाटलीबंद पाणी व्यवसायाच्या आमिषाने २.३४ कोटींची फसवणूक; तिघांवर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : बाटलीबंद पाणी विक्री व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका पेट्रोल पंप व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत हडपसर परिसरातील हांडेवाडी येथे राहणाऱ्या व्यावसायिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे परस्पर ओळखीचे असून आरोपींचा वस्त्रदालन व्यवसाय आहे. त्यांनी फिर्यादीला बाटलीबंद पाणी विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवत मोठ्या नफ्याचे आश्वासन दिले.
त्यावर विश्वास ठेवून १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दोघांमध्ये भागीदारीचा करार करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी टप्प्याटप्प्याने फिर्यादीकडून १ कोटी ७८ लाख ७५ हजार रुपये उकळले. तसेच, जून ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान व्यवसायातून मिळालेले ५५ लाख ४८ हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यात वळवून घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबर करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.